निर्भय स्वातंत्र्य (Fearless Freedom)

Tags

, , , ,

डिसेंबर २०१२ मध्ये ज्योती सिंग नावाच्या महिलेवर बलात्कार झाला व तिची निर्घृणपणे हत्या केली गेली. ही  घटना दिल्लीत झाली. ह्या घटनेची बातमी पसरता देशभरात शोक आणि रागाचा उद्रेक झाला. निर्भया प्रकरणावर राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय लक्ष केंद्रित झाले. समाजातील अनेक घटक एकत्रित आले. सरकारने हे प्रकरण अत्यंत वाईट पद्धतीने हाताळले. २०२१ मध्ये मागे वळून पहाता, असे लक्षात येते की त्याही पेक्षा वाईट हाताळणी करण्याची सरकार मध्ये क्षमता आहे. असो. एक कडक कायदा बनवण्यात आला. पण ह्या सर्व गोष्टींचा महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाहीं. ही बाब आपण पुन्हा कधीतरी बघू.

ह्या घटनेनंतर काही दिवसांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांच्या निवासस्थानासमोर काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्या निदर्शनात प्रख्यात कार्यकर्त्या कविता कृष्णन ह्यांनी एक अत्यंत प्रभावी भाषण केले. त्या भाषणात त्यांनी महिलांसाठी निर्भय स्वातंत्र्याची (Fearless Freedom) मागणी केली. महिलांनी सुरक्षित राहायचे असेल, तर त्यांच्यावर बंधने येणे स्वाभाविक आणि अनिवार्य आहे, हे समीकरण मोडून काढले. महिलांनी काय कपडे वापरावे, कुठे जावे, का जावे  ह्याचा त्यांच्या सुरक्षिततेशी काहीही संबंध नाही अशी मांडणी केली. कविता म्हणाल्या

महिलांना जर का बाहेर पडायचे असेल, अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा, तर त्या बद्दल त्यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक का असावे? “ती कमावरून परत येत होती” “कामाच्या ठिकाणी उशीर झाला” अशी करणं का पुढे करावी? एका महिलेला रात्रीच्या वेळी चालायला जावेसे वाटले, बाहेर पडून एखादी सिगारेट ओढावीशी वाटली तर तो काय आपल्या देशात गुन्हा आहे? ‘महिलांनी फक्त आणि फक्त कामाकरिता घराबाहेर पडावे, हा संरक्षणात्मक युक्तिवाद आम्हाला मंजूर नाहीं. महिला घरात असली काय किंवा बाहेर असली काय, दिवसा किंवा रात्री, कारण असो अथवा नसो, कुठलेही कपडे घातले असले तरी – त्या महिलेला पूर्ण स्वातंत्र्य असावे. तो तिचा हक्क आहे. आणि ह्याच भीतीरहित स्वातंत्र्याचे आपण रक्षण करायला हवे. त्याची जोपासना करायला पाहिजे.

हे भाषण अत्यंत गाजले. बऱ्याच लोकांच्या मनाला स्पर्श करून गेले. गेल्या काही वर्षात महिला हक्क चळवळींनी ‘सुरक्षितता’ ह्या पितृसत्ताक संकल्पनेला आव्हान दिले आहे. ह्या चळवळी सुरु असतानाच, महिलांच्या स्वायत्ततेला होणारा विरोध वाढत आहे. ह्या सगळ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर कविताने हे पुस्तक लिहिले आहे. ह्या पुस्तकात कविता वाचकाला आवाहन करते – महिलांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली घराघरात, समाजात, देशात महिलांच्या स्वायत्ततेवर हल्ला होत आहे. ह्या बाबीकडे आपण पुन्हा एका नवीन दृष्टिकोनातून विचार करायला हवा.

मी समाजसेवा क्षेत्रात जवळजवळ ३० वर्षे कार्यरत आहे. ह्या कालावधीत मी महिलांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःच्या वागणुकीत भेदभाव न करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या प्रयत्नांना मित्र-मैत्रिणी, सहकारी, कार्यकर्ते ह्यांचा सहभाग होता. प्रवास चालूच आहे. हे पुस्तक वाचल्याने मला महिलांच्या प्रश्नांकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून बघण्याचा मार्ग गवसला आहे.

मूळ पुस्तक इंग्रजीत आहे. ते सर्वांना वाचता येईलच असे नाहीं. पूर्ण पुस्तक वाचायला कदाचित वेळ नसेल, आवड नसेल. त्या सर्वांकरिता मी हे पुस्तक थोडक्यात मांडतो आहे. कारण सोपे आहे. महिलांच्या प्रश्नांचा आपण कसा विचार करतो, मुळात विचार करतो का, हे आपण स्वतःच तपासायला हवे. पुरुषांनी तर विचार करायलाच पाहिजे. महिलांनीही विचार करायला हरकत नाहीं; आपण सर्वच पितृसत्ताक पद्धतीत राहातो, त्याच पद्धतीतून निर्माण झालेल्या संकल्पना बाळगतो.

_________

ह्या पुस्तकात महिलांची स्वायत्तता नाकारण्याच्या पाच पद्धतींचे कविताने विश्लेषण केले आहे.

उच्च दर्जा की तुरुंग?

वर्णद्वेषावर काम करणाऱ्या एका अज्ञात कार्यकर्त्याने उच्च दर्जाची तुलना तुरुंगाशी केली होती. आपण जेव्हा स्त्रियांना देवीचा, मातेचा, दर्जा देतो, त्यांची पूजा करतो तेव्हा त्यांच्यावर अन्याय तर करत नाही ना? कदाचित अन्याय करतो. दुसऱ्या टोकाला जेव्हा आपण स्त्रियांनां मुलीचा दर्जा देतो तेव्हा आपण त्यांची स्वायत्तता नाकारतो का? नक्कीच नाकारतो. थोड्या दिवसांपूर्वी झालेल्या ऑलिम्पिक खेळांचे उदाहरण घेऊ. पदक मिळवणाऱ्या बायकांना आपण किती पटकन “भारतदेशाच्या सुकन्या” म्हणून संबोधित केले. पुरुषांना “सुपुत्र” नाहीं म्हणालो. देवीचा दर्जा असो किंवा मुलीचा – आपण त्या दर्जातच महिलांना बंदिस्त करतो.

महिलांना हा दर्जा हवाहवासा आहे हे मानण्यात काहीच तथ्य नाहीं. त्यांना ह्या तुरुंगात राहायचे आहे असा समज चुकीचा आहे. बरं ही स्वायत्ततेची भूक नवीन आहे, पाश्चात्य संस्कृतीमधून अली आहे असेही मानण्याचे कारण नाहीं. पुस्तकात ६०० BC, म्हणजे आज पासून सुमारे २६०० वर्षांपूर्वी राहणाऱ्या सुमंगलामाता नावाच्या बौद्ध भिक्षुणीचा एक सुंदर किस्सा आहे. तिचा बेकार नवरा मेल्यावर ती लिहिते

आज मी, एक नारी, स्वतंत्र आहे
घरातल्या रांधा वाढा उष्टी काढा च्या चकाट्यातून मुक्त

भुकेपासून मुक्त
त्या बेक्कार पुरुषापासून स्वतंत्र.

स्वातंत्र्याची भूक मानवी इतिहासाइतकीच जुनी आहे. पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सुद्धा. स्त्रियांना उच्च दर्जा देण्याची आवश्यकता नाहीं. त्यांना देवी, माता, मुलीचा दर्जा देण्याची गरज नाहीं. त्यांना निव्वळ मानवाचा दर्जा आणि हक्क दिले, तर महिला आणि पुरुष सुखी राहू शकतात.

धोरण – महिलांच्या सक्षमीकरणाचे?

“कैसे खाओगे उनके हाथ की रोटियां जब पैदा ही न होने दोगे बेटियां” हे घोषवाक्य आठवते? देशभरात भिंतींवर मोठ्या अक्षरात हे वाक्य रंगवले होते. “बेटी बचाओ बेटी पढाओ” मोहिमेत हे वाक्य वापरले गेले. त्यावरून आठवले – बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा पंचायतराज संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले होते तेव्हा बिशाखा दत्ता ह्या महिला अधिकार कार्यकर्तीने एक पुस्तक लिहिले होते “पण, पोळ्या कोण बनवणार?”. किस्सा असा कि जेव्हा पुरुषांना सांगण्यात आले की आता महिला सरपंच होऊ शकतात, तेव्हा एका पुरूषाने हा प्रश्न विचारला – मगर फिर रोटी कौन बनायेगा? असो.

महिलांच्या सक्षमीकरणाकरता सरकार बरीच धोरणे आखते. त्यातली किती धोरणे उपयोगी असतात? धोरणांमुळे महिलांचे खरोखरच सक्षमीकरण होते का? पितृसत्ताक विचार आणि समाजातील प्रथांमुळे महिलांवर त्या धोरणांमुळे अत्याचार तर होत नाहीत ना? “बेटी बचाओ” असो किंवा “स्वछ भारत” असो, धोरण बनवताना व त्या बद्दल बोलताना महिलांची ‘सुरक्षितता’ हमखास समोर येते. पुरुष पुरुषांपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी धोरण बनवतात, कायदे बनवतात. ह्या पेक्षा मोठी विडंबना काय असू शकते?  कोणी कधी महिलांना विचारले आहे का – “तुम्हाला संरक्षण हवे आहे का?”?

पुस्तकात कविता ग्रामीण बिहारमधील एक छान गोष्ट सांगते. गावागावातून पहाटे आणि संध्याकाळी, महिला एकत्र येऊन बाहेर संडासला जातात. हे आपल्याला माहीत आहे. एकदा एका कार्यकर्तीने बिहार मधल्या एका गावातील महिलांना विचारले “तुम्हाला घरात संडास असला तर उपयोगी नाहीं का व्हायचे?”. महिला हसल्या आणि म्हणाल्या “ताई, घरात संडास असला तर घरातील पुरुषांना आम्हाला घरात डांबून ठेवायला आणखीन एक छान कारण मिळेल. ‘संडासला जाते’ ही सबब वापरून निदान घरातून बाहेर तरी पडता येते. इतर बायका भेटतात. गप्पा होतात. थोडा वेळ हलकं वाटते. आम्ही एकत्र बाहेर पडतो व जास्तीत जास्त वेळ बाहेर कसे राहता येईल हे बघतो. नको बाबा, घरात संडास अजिबात नको.” हीच प्रतिक्रिया मी स्वतः मराठवाड्यामध्ये २००१ मध्ये ऐकली होती.

प्रेमळ बंधन

लहानपणापासून आपण रक्षाबंधनाच्या दिवशी टीव्ही वर गाणी ऐकत आलो आहोत.  राणी कर्णावतीने हुमायूनला राखी पाठवून संरक्षणाची मागणी केल्याची कथा प्रत्येकाला माहीत आहे. हे प्रेमापोटी स्वीकारलेले हलके बंधन आहे, का कडक साखळदंड? स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगातून ही बंधने कसे अत्याचार घडवू शकतात हे दाखवते. क्षुल्लक कारणांवरून भावांनी बहिणींवर केलेल्या अत्याचाराच्या कथा आपल्याला माहीत आहेत. कधी कधी भाऊ बहिणीची हत्या सुद्धा करतो हे आपण ऐकले आहे. वाचले आहे. सैराट चित्रपट आठवतो?  खरोखरच महिलांना ह्या संरक्षणाची गरज आहे का? त्या ‘संरक्षणासाठी’ बंधनात अडकण्याची किंमत रास्त आहे का? हे सवाल कविता विचारते.

महिला घरात सुरक्षित असतात. हे विधान आपण नेहमी ऐकतो. पण हे खरे आहे का? देशातील ४०% महिलांवर हे ना ते प्रतिबंध लादले जातात. घराघरातून महिलांवर अत्याचार होतात. क्षुल्लक कारणांकरता मारहाण होते – न विचारता घराबाहेर गेली म्हणून; भाजीत मीठ जास्त पडले म्हणून, नवऱ्याबरोबर शरीरसंबंधाला नकार दिला म्हणून. कुठलेही कारण पुरते. NHFS४ सर्वेक्षणात आढळून आले की बहुतांश पुरुषांना तर ही मारहाण योग्यच वाटतेच, पण बऱ्याच महिला मारहाण योग्य आहे असे मानतात.  अशा परिस्थितीत महिला घरामध्ये सुरक्षित आहेत असे म्हणता येईल का? गोरख पांडे ह्या कवीची “बंद खिड़कियों से टकराकर” ही  कविता घरात कोंडलेल्या महिलांचे आयुष्य दाखवते. “महिला एक स्वतंत्र व्यक्ती आहे. स्वायत्त आहे. कितीही प्रेमाने जपली गेली तरी कुणाची मालमत्ता नाहीं. नवऱ्याची नाही. कुटुंबाची नाहीं. मुलांची नाहीं.” ही संकल्पना समजायला खरोखरच कठीण आहे का?

‘संघटित’ गुन्हे

महिलांना त्यांची ‘जागा’ दाखवणारे आणि गरज पडल्यास हिंसा करणारे आजच्या मितीला संघटित आहेत. धार्मिक कट्टरवादी असोत, किंवा खाप पंचायत, किंवा “romeo पथक” असो – ताकदवान आहेत. त्यांना साथ मिळते “Love जिहाद” विरोधी कायद्यांची. ह्या संघटना, कायदे एकच ध्येय समोर ठेवून काम करतात – महिलांनी आपल्या मर्यादेबाहेर जाऊ नये. ह्या मर्यादा ज्या पितृसत्ताक पद्धतीने ठरवल्या जातात. पुरुष ठरवतात. ह्या संघटनांना राजकीय पाठबळ मिळते. एकमेकांना ते मदत करतात – आम्ही मनमानी करतो, निवडणुकीत तुम्हाला मतं मिळवून देतो; तुम्ही आमच्या कारभारात हस्तक्षेप करू नका. कितीही घृणास्पद वागणूक असली तरी ह्या संघटनांना कायद्याची भीती नसते. पोलीस तरी कशाला हात लावतील; ते सुद्धा ह्याच सामाजिक प्रणालीचा भाग आहेत. २०१२ च्या निर्भया बलात्कारानंतर उसळलेल्या चळवळींमध्ये महिलांनी म्हणूनच “खाप से भी आझादी, बाप/भाई से भी आझादी” अशी घोषणा दिली होती. अर्थात “खाप” चा अर्थ ह्या सर्वच संघटना मानायला हवे.

कामाच्या जागा – कार्यालये किंवा कारखाने

महिलांच्या सक्षमीकरणाच्या जेव्हा चर्चा होतात तेव्हा एक युक्तिवाद नेहमीच केला जातो – महिला जर पैसे कमवायला लागल्या, तर त्या सर्व बाबतीत सक्षम होऊ शकतात. सरकार आणि समाजसेवी संस्थांचे अनेक प्रकल्प ह्या गृहितकावर आधारित असतात. त्यामुळे सगळीकडे महिलांना सशुल्क कामात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जाते. जेव्हा हे काम जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळलेले असते तेव्हा तर सगळेच सक्षमीकरणाच्या विचारानेच हर्षोल्हासित होतात. काही अंशी ही बाब खरी आहे. स्वतःच्या कमाईचे पैसे मिळाल्यावर, महिलांचा आत्मविश्वास वाढतो. पण त्याच बरोबर त्यांच्या इतर जबाबदाऱ्या जर कमी झाल्या नाहीत, तर त्यांच्यावरचा बोजा वाढतो. शिवाय, एखादी महिला जेव्हा पैसे कमावते तेव्हा ते खर्च करण्याचा अधिकार तिच्याकडॆ असतो हे मानायचे काहीही कारण नाहीं. असो, हा एक मोठा विषय आहे. ह्याकडे पुन्हा कधीतरी वळूया.

भारतात, खासकरून दक्षिण भारतात, कपडे तयार करणारे अनेक कारखाने आहेत. ह्या कारखान्यां मधुन अनेक महिला आणि मुली काम करतात. पुस्तकात कविता ह्या महिला कामगारांच्या परिस्थितीवर लिहिते “आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कारखानदार, सरकार च्या पाठिंब्याने, ह्या महिलांचे शोषण करतात. त्यांच्या सुरक्षिततेची सबब सांगून त्यांना वसतिगृहांमध्ये डांबून ठेवतात. अनेक नियम त्यांच्यावर लादतात, जे पुरुष कामगारांना लागू होत नाहीत. हे सगळे कामगार कायद्याना धरून नाहीं. ह्या महिलांना स्वायत्तता तर सोडाच, थोडेसे स्वातंत्र्य पण मिळत नाही.”

गावागावातून आरोग्य सेवा देणाऱ्या आशा (ASHA) कार्यकर्त्यांची काहीशी अशीच अवस्था आहे. त्यांना स्वयंसेवक मानले जाते आणि त्यांच्याकडून फार कमी मोबदला देऊन भरमसाठ काम करून घेण्यात येते. एका अर्थाने त्यांची पिळवणूकच होत आहे. COVID१९ च्या महामारीत सुद्धा त्यांचे शोषण चालू राहिले. चालू आहे.

__________

ह्या पुस्तकात पितृसत्ताक समाज पद्धतीला सामोरे जाऊन लढणाऱ्या अनेक महिलांच्या कथा आहेत. हदिया सारख्या महिलांनी विजय मिळवला, कौसल्येला तिच्या लढ्यात यश मिळाले नाहीं.

पुस्तकाच्या शेवटी कविता म्हणते “ह्या पुस्तकाने जग बदलणार आहे का? कदाचित नाही बदलणार. पण तुम्ही आणि मी ज्या नजरेतून महिलांच्या प्रश्नांकडे बघतोय त्यामध्ये तसूभर जरी फरक पडला तर तो विजय मानावा लागेल. महिलांच्या स्वायत्ततेचा, स्वातंत्र्याचा आपण विचार केला, त्यांच्या निर्भयी स्वातंत्र्याची जोपासना केली, तर जग बदलेल.

पुस्तकाच्या ह्या सारांशामुळे तुम्हाला वेगळ्या प्रकारे विचार करण्यासाठी खुराक मिळाला असेल अशी माझी आशा आहे.  पुस्तक ह्या सर्व बाबीचा विचार करतात. जमल्यास अवश्य वाचा. इतरांना वाचण्यासाठी प्रोत्साहित करा. खासकरून पुरुषांना. महिलांना निर्भयी स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढ्याची जरुरत आहे आणि त्या लढ्यात आपण सर्व सहभागी होऊ शकतो, किंबहुना आपण व्हायलाच पाहिजे.

कदाचित एक दिवस असा उजाडेल की  कवियत्री Sylvia Path ने जे स्वप्न महिलांकरिता बघितले होते, ते साकार होईल.

महिलेचा जन्म घेणे ही  माझी शोकांतिका आहे. जन्म झाल्यापासून मी स्त्री म्हणून एका कचाट्यात सापडले आहे. माझी इच्छा आहे की  मी पण मुक्त हिंडावे, गर्दीत सामील व्हावे, लोकांशी बोलावे, त्यांचे ऐकावे. पण, मी एक मुलगी, एक स्त्री असल्याने जिथे जाईन तिथे मला धोका असतो. मारहाणीचा धोका, बलात्काराचा धोका. मी जेव्हा पुरुषांना जाणून घ्यायचा प्रयत्न करते तेव्हा माझ्यावर आरोप होतात. मला हिणवले जाते. देवा मला मुक्त फिरायचंय, खूप खूप गप्पा मारायच्या आहेत, आकाशाला छप्पर करून उघड्या शेतात झोपायचे आहे, रात्री अपरात्री निर्भयपणे चालायचे आहे….

मकरंद

I wrote this originally in English. That version is available here.